पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने माऊली आणि तुकोबांच्या पालख्या सुरु होण्याअगोदर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांवर माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांंचा पंढरीच्या दिशेने प्रस्थान सोहळा येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून प्रस्थान सोहळ्याच्या तयारीला सुरूवात केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या वाकऱ्यांची संख्या मोठी असते. यामुळे माहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने आषाढी वारीकरिता पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ७५० बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून वारीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर या बसेस सोडण्यात येणार आहेत. पुणे विभागातील १४ आगारांतून पंढरपूरसाठी एसटी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सहा जुलै रोजी आषाढी यात्रा असल्यामुळे त्या अगोदर गाड्या सोडण्यास सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना बसची कमतरता भासणार नाही.
पंढरपूरला जाण्यासाठी साडेतीनशे बस या पुणे विभागाच्या असणार आहेत. तर इतर चारशे बसेस या मुंबई व विदर्भ विभागातून मागविण्यात आल्या आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर आगारांतून मोठ्या प्रमाणात बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
४० जणांच्या समूहाने एकत्र बुकिंग केल्यास एसटी त्यांच्या गावात जाऊन प्रवाशांना पंढरपूर येथे सोडेल. त्यानंतर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. त्यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच एकाच गावातील वाकऱ्यांनी समूहाने एसटीचे बुकिंग केल्यास त्यांच्या गावातून गाडी सोडण्याची व्यवस्था देखील एसटी प्रशासनाने केली आहे.


