मुंबई : वृत्तसंस्था
पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांनी तुरुंगातील एका आरोपीकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. या प्रकरणामुळे पोलिस प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे की, “जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असून, त्यांनी आयजी पदावर असताना एक लाख रुपये रोख आणि ५० हजार रुपयांचा मोबाईल घेतल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तसेच, तुरुंगातील आरोपीकडून ३०० कोटी रुपये मागितल्याची तक्रारही माझ्याकडे आली आहे,” असं सुरेश धस यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना म्हणाले, “ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागता याचा अर्थ तुम्ही शंभर टक्के फाॅल्टी आहात. सुपेकरमध्ये नैतिकता नावाची गोष्ट काही राहिलेली दिसत नाही. नैतिकता खाली ढासळत चालल्याची हे उदाहरण आहे.’, असं देखील सुरेश धस म्हणाले.
‘अरे 150 कोटी प्राॅपर्टी तिला जाळायचे का? आता ती कोण खाणारे आणि हे बाहेर आले तरी त्यांना शेणच हाणणार आहेत लोक. असे लोक कितीही वर्षांनी बाहेर येवोत समाजाने शेण आणि रंदा सोबतच ठेवायला पाहिजे. असे लोक बहिष्कृत करायला पाहिजे.’, असा हल्लाबोल सुरेश धस यांनी हगवणे कुटुंबियांवर केला आहे. या आरोपांनंतर राज्य सरकारने जालिंदर सुपेकर यांच्याकडील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे आणि त्यांची बदली करण्यात आली आहे. सुपेकर यांना उप महासमादेशक (होमगार्ड) या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.


