चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील घाट रोडवरील गोकुळधामच्या पाठीमागे असलेल्या शुभश्री पार्कमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरफोड्या करून सुमारे १ लाख ५० हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. चोरीची ही घटना २६ रोजी रात्री ११ ते २७ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
दीपक राजेंद्र साळकर (शुभश्री पार्क, चाळीसगाव) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो व त्याची आई आणि बहीण असे २६ रोजी रात्री ११ वाजता जेवण करून पुढच्या हॉलमध्ये झोपले. पहाटे ६ वाजेच्या सुमारास दीपक यांची आई उठली असता घराचा बेडरूमचा दरवाजा उघडत नव्हता. हा दरवाजा आतील बाजूने कोणीतरी लॉक केल्याचे लक्षात आले. याचवेळी साळकर यांना घराच्या बाहेर लोकांचा आवाज आल्याने बाहेर आले असता मुकेश विरेंद्रकुमार रेजा या भाडेकरूकडे चोरी झाल्याचे रहिवाशांनी सांगितले. दीपक साळकर यांनी मित्रांना फोन करून घरी बोलावले व घराच्या मागील बाजूने जावून पाहिले असता घराच्या बेडरूमचा मागील दरवाजाचा आतील कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून चोरी केल्याचे समोर आले. याप्रकरणी दीपक राजेंद्र साळकर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी कपाटातील १५ हजार रूपये रोख, ५० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे बाह्या, अंगठी, नथ, हार तसेच १० हजार रूपये किंमतीचे चांदीचे ब्रेसलेट असा सुमारे ७५ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. याच कॉलनीतील विरेंद्रकुमार रेजा यांच्या घरातही चोरी झाल्याचे समोर आले. रेजा यांच्या घरातून चोरट्यांनी २० हजार रूपयांची रोकड, ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे पंडल, १५ हजार रूपये किमतीच्या चांदीच्या बांगड्या व ग्लास, ५ हजार रूपये किंमतीचे पांढऱ्या रंगाचे मोती असा सुमारे ८० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. या दोन्ही घरफोडीत चोरट्यांनी एकूण १ लाख ५० हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला. एकाच कॉलनीत एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


