चाळीसगाव : प्रतिनिधी
चहा पिण्यासाठी हॉटेलवर आलेल्या चौघांना चहाचे पैसे मागितल्याचा राग येऊन हॉटेलचालकासह कामगारास मारहाण करीत चॉपरसह अन्य लोखंडी वस्तूने डोक्यावर वार करून जबर जखमी केल्याची घटना शहरातील नागद रस्त्यावर घडली. याप्रकरणी नागदरोड झोपडपट्टी भागातील चौघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मझहर खान इक्बाल खान (रोशननगर, पाटणादेवी) याचे नागद रोडवर चहाचे हॉटेल आहे. १६ रोजी रात्री ८ वाजता हॉटेलमालक मझहरखान व कामगार उमेर शेख रफीक है ग्राहकांना चहा देत असताना करीम खान रसुल ऊर्फ पप्पू तसेच शोएब खान जमील खान व त्यांच्या सोबत दोन व्यक्ती (नागदरोड झोपडपट्टी) चहा पिण्यासाठी आल्या. चहा पिल्यानंतर हॉटेलवरून निघून जात असताना हॉटेल कामगाराने त्यांच्याकडे चहाचे पैसे मागितले असता त्याचा राग येऊन पप्पू खान याने उमेर शेख याच्या कानशिलात लगावली.
मझहर खान चौघांची समजूत घालत असताना पप्पू व शोएब तसेच त्यांच्यासोबत असलेले दोघे शिवीगाळ करू लागले. यावेळी शोएब खान याने त्याच्या हातातील लोखंडी वस्तूने उमेर शेख याच्या डोक्यावर मारले. त्यावेळी मझहर खान वाचविण्यास गेला असता करीम खान याने लोखंडी चॉपरने उजव्या कानावर तसेच डोक्यावर मारले. या हल्ल्यात दोघे जबर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात, नंतर तेथून धुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पप्पू ऊर्फ करीम खान रसूल खान, शोएब जमील खान व त्यांच्या सोबत दोन अज्ञात व्यक्ती अशा चौघांच्या विरोधात पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


