जळगाव : प्रतिनिधी
भरधाव बसने चारचाकी वाहनाला कट मारल्याने अपघात होऊन चारचाकीतील प्रवासी जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (१५ मे) जळगाव ते भुसावळ रस्त्यावर झाला. सदर बसचालकाने अंमली पदार्थ सेवन केल्याचे आढळून आल्याने वाहकालाच बस मुक्ताईनगरपर्यंत न्यावी लागली. याप्रकरणी बसचालक विजय शिवाजी पाटील (रा. खेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबादजवळ चारचाकी वाहनाला जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या बसवरील (क्र. एमएच ०६ एस ८५३४) चालक विजय पाटील याने वाहनाला कट मारला. यात वाहनाचे नुकसान होण्यासह प्रवासीही जखमी झाले. हे प्रकरण नशिराबाद पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथे अपघातग्रस्त चारचाकी वाहनाच्या चालकाने नुकसान भरपाईची मागणी केली. बस वाहकाने जळगाव आगारात माहिती दिली. त्यानुसार जळगाव बसस्थानक प्रमुख मनोज तिवारी हे तेथे पोहोचले.
पोलिस ठाण्यात बसचालकाने अंमली पदार्थ सेवन केल्याचा गंध आला. त्यानुसार आगारप्रमुखांनी त्याची मशीनद्वारे तपासणी केली असता बसचालकाने अंमली पदार्थ सेवन केल्याचे आढळूनही आले. चालकाची वैद्यकीय चाचणीदेखील केली, त्याचा अहवाल येणे बाकी आहे. अखेर बसच्या वाहकाने ही बस मुक्ताईनगरपर्यंत नेली, अशी माहिती आगार प्रमुखांनी मनोज तिवारी यांनी दिली.


