मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीसाठी लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली होती तर विरोधकांकडून बहिणींना २१०० रुपये मिळावे याची मागणी करीत असतांना आता लाडकी बहीण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावला असून तब्बल अडीच हजारांहून अधिक बनावट खाती आढळली आहेत. याप्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरातमधील असून तो सध्या फरार आहे.
दरम्यान, याप्रकरणानंतर राज्याचा महिला विकास विभाग खडबडून जागा झाला आहे. दीड कोटी केसरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना सोडून एक कोटी लाभार्थी लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा हवेत विरून गेली. मात्र, आता ही पडताळणी युद्धपातळीवर करण्याचे आदेश सर्व जिल्हा महिला विकास विभागांना देण्यात आले आहेत. अशी माहिती महिला विकास विभागाकडून देण्यात आली आहे. महिला विकास विभागाच्या पातळीवर आतापर्यंत कोटेकोर पडताळणी होत नसल्याने सरकारच्या पर्यायी जनतेचे लाखो रुपये अपात्र बहिणींच्या बँक खात्यावर जमा होत आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी पुरुषांची ‘केवायसी’ कागदपत्र घेऊन त्यांच्या बँक खात्यात कोट्यवधींचा व्यवहार केला जातो. त्याचवेळी स्त्री व पुरुषांचे नामसाधर्म्य असलेल्या बँक खात्यात पुरुषांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतला असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळे योजनेची संपूर्ण काटेकार पडताळणी करण्याचे आदेश महिला विकास विभागाकडून देण्यात देण्यात आले आहेत


