चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील नागद रोडवरील मिरची बाजारात आज दि.११ रोजी दुपारी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे मोठे आणि धुराचे लोळ दूरवरून दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिरची बाजाराच्या अगदी जवळ पेट्रोल पंप असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता परिसरातील नागरिकांमध्ये अधिक घबराट निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या पहिल्या टप्प्यात मिरची बाजारात उभ्या असलेल्या काही मोटारसायकली जळाल्या, ज्यामुळे मोठे स्फोट झाले आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत एक ट्रक देखील जळून खाक झाला आहे. आगीच्या भयंकर स्वरूपामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव नगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत, जेणेकरून ती आणखी पसरू नये आणि पेट्रोल पंपापर्यंत पोहोचू नये. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिरची बाजारात मोठ्या प्रमाणात मिरची आणि इतर शेतमालाचा साठा होता, जो या आगीत जळून खाक झाला असण्याची शक्यता आहे.


