वॉशिंग्टन वृत्तसेवा । कौटुंबिक वादातून माजी नवऱ्याला आईने गोळी घालून हत्या केली. यात गुन्ह्यातील आईला अटक करण्यात आली. यामुळे पाच मुलं उघड्यावर पडली. अशावेळी या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यातील ‘आई’ जागी झाली. पोलिस अधिकारी निकोलस क्विंटाना यांनी पाचही मुलांना दत्तक घेतले.
याबाबत माहिती अशी की, लास वेगासमध्ये राहणारी ४० वर्षीय एमिली एज्रा या महिलेने तिचा घटस्फोटित पती पॉल याची गोळ्या घालून हत्या केली होती. दोघांमध्ये काही कारणावरुन वादावादी झाली. त्यानंतर संतापाच्या भरात महिलेने पहिल्या नवऱ्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. १४ जानेवारी २०२२ रोजी ही घटना उघडकीस आली.
पोलीस अधिकारी निकोलस जेवायला बसत असताना एका खुनाच्या प्रकरणाबाबत त्यांना फोन आला. माहिती मिळताच ते त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना एक भयानक दृश्य दिसलं. पाच मुले एका कोपऱ्यात घाबरुन बसली होती. त्यांच्या वडिलांना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आईने गोळ्या घालून ठार मारलं होतं.
आरोपी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर, निकोलस त्यांच्या घरी परतले, परंतु त्या मुलांचा विचार ते मागे सोडू शकले नाहीत. या प्रकरणावर पत्नीशी दीर्घ काळ चर्चा केल्यानंतर, निकोलस यांनी पाचही मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाच्या तपासात इतरही पोलीस अधिकारी होते, मात्र निकोलस यांना मुलांविषयीचा अधिक कळवळा जाणवत होता. मुलांच्या डोक्यावरचं पितृछत्र काळाने हिरावलं, तर मातृछत्र महिलेच्या कर्मामुळे हरपले मात्र पोलीसांच्या मातृत्वामुळे पालकमत्व मिळाले आहे.


