धुळे प्रतिनिधी । मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर झालेल्या विचित्र अपघातात केमिकलची वाहतूक करणाऱ्या टँकरला ट्रकने मागून ठोकल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात स्फोट झाल्याने संपूर्ण टँकरने पेट घेतला. या अपघातात टँकर चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर गावाजवळ मंगळवारी १ फेब्रुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुमारास मध्यप्रदेशकडून शिरपूरच्या दिशेने केमिकलने भरलेला टँकर जात होता. यावेळी भरधाव टँकरने ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत टँकर रस्त्यावरच उलटताच टँकरचा स्फोट झाला. टँकरला भीषण आग लागल्यामुळे आगीचे लोळ बाहेर येत होते. या दुर्घटनेत टँकर जळून खाक झाले आहे. टँकरचा चालक टँकरमध्ये अडकल्याने या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटाचा मोठा आवाजामुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले होते. टँकरमध्ये केमीकल असल्यामुळे आगीचे लोळचे बाहेर पडत होते. शेवटचे वृत हाती आले तेव्हा पोलीस प्रशासन आणि नागरीक हे आग विझविण्यासाठी प्रयत्न करत होते.


