अमळनेर : प्रतिनिधी
धार येथील पाझर तलावात बारावीतील जयेश दीपक पाटील या एका विद्यार्थ्यांचा शुक्रवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. जयेश आणि आणखी दोघे जण शुक्रवारी दुपारी धार येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यात असलेल्या मंदिरापर्यंत पोहण्याची स्पर्धा त्यांच्यात लागल्याचे समजते. त्यात तो पाण्यात बुडाला.
दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मारवड पोलिसांच्या उपस्थितीत मारवड पोलिस ठाण्याचे पोहेकाँ सुनील तेली, पोहेकॉ मुकेश साळुंखे, कुलदीप चव्हाण (रा.अमळनेर), प्रशांत धाप (रा.अमळनेर), इक्बाल शेख (रा.धार), सोपान पाटील (रा.धार) यांनी सदर तरुणाचा मृतदेह तलावातून काढला. जयेश हा कंडारी गावाचा रहिवासी होता. त्याने शिक्षणासाठी शहरातील अयोध्या नगरात रूम केला होता, प्रताप महाविद्यालयात अकरावी केल्यानंतर त्याने बारावीसाठी मारवड येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. जयेश हा दीपक भरत पाटील यांचा एकुलता एक मुलगा आहे. जयेशच्या पश्चात आई, वडील, एक बहीण आणि आजी, आजोबा आहेत.


