जळगाव : प्रतिनिधी
शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या हॉटेल शालिमार या परमिट रूम व बारमध्ये मद्यपान करत असलेल्यांमध्ये वाद होऊन एका जणाने गोळीबार केला. सुदैवाने यात कोणाला दुखापत झालेली नाही. मंगळवारी रात्री घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल शालिमार येथे दारु पित असताना अचानक टोळक्यातील एकाने जमिनीवर गोळीबार केला. मोठा आवाज झाल्याने हॉटेलमधील कर्मचारी घाबरले. टोळक्याने तेथून पळ काढला. कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती हॉटेल मालकाला दिली व त्यांनी जिल्हापेठ पोलीसांना कळविले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस तपासणीत हॉटेलमधून गोळीबार केलेला रिकामा राऊंड मिळून आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे. आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गोळीबार, हाणामारीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. पोलिसांनी अशा प्रकारच्या घटना प्रतिबंध बसावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



