अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील गांधली रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकली. या अपघातात वृद्ध जागीच ठार झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सप्तशृंगी मंदिराजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिळोदा येथील युवराज दयाराम पाटील (६२) व त्यांच्या पत्नी मंगलबाई युवराज पाटील (५५) हे मोटारसायकलवर पारोळा येथे गेले होते. सायंकाळी गावाकडे परत येत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने युवराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर मंगलबाई गंभीर जखमी आहेत. तातडीने नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिले. शवविच्छेदनसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. हे.कॉ. सुनील पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


