जळगाव : प्रतिनिधी
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहनाने समोर जाणाऱ्या दुसऱ्या मालवाहू वाहनाला धडक दिल्याने ते रस्त्याच्या कडेला उतरले व चालक राजेंद्र सुभाष महाजन (वय २५, रा. नागोबामठी जवळ) हे जखमी झाले. हा अपघात दि. १० नोव्हेंबर रोजी नशिराबाद येथे रेल्वे पुलाच्या पुढे झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील नागोबामठीजवळ राजेंद्र महाजन हे वास्तव्यास असून (एमएच १९, सीवाय ६४३९ ) क्रमांकाचे वाहन घेऊन जात असताना मागून येणाऱ्या दुसऱ्या मालवाहू वाहनाच्या (एमएच १९, सीवाय ८७४६ ) चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यात या वाहनाची महाजन यांच्या वाहनाला धडक बसली व ते रस्त्याच्या खाली उतरले. त्यात महाजन यांचा पाय फॅक्चर होण्यासह इतर ठिकाणीही मार लागला. या प्रकरणी त्यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहेत.



