


वाशीम : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक खुनाच्या घटना घडत असतांना वाशीम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेकडे निघालेल्या ५४ वर्षीय शिक्षकावर रस्त्यात दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपींनी आधी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले व नंतर पेट्रोल टाकून जाळले. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता वाशिम जिल्ह्यातील मालेगावजवळ घडली. त्यात दिलीप धोंडुजी सोनुने यांचा मृत्यू झाला.
शहरातील शेलू फाटा परिसरात राहणारे दिलीप सोनुने हे बोरगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. साेमवारी सकाळी १० वाजता ते नेहमीप्रमाणे दुचाकीवर (एमएच ३७ वाय १४३८) बोरगावकडे जात होते. मालेगावपासून ४ किलोमीटर अंतरावर कोल्ही गावाजवळ निर्मनुष्य भागात दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यात जोरदार वार केले. त्यामुळे गंभीर जखमी झालेले सोनुने हे जागेवरच पडले. त्याच अवस्थेत हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. यात ते गंभीर भाजले. या भागातून जाणाऱ्या व्यक्तींनी हा प्रकार पाहून तातडीने पोलिसांना फोनवर माहिती दिली.
पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी दिलीप सोनुने यांना तातडीने वाशिम जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान सोनुने यांचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक एक्स्पर्टनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कुटुंबीयांकडून प्राथमिक माहिती मिळवत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जऊळका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच आम्ही आरोपीला अटक करू, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप राठोड यांनी दिली.


