पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे शनिवारी भरदुपारी गावाच्या मध्यभागी असलेल्या शेतकऱ्याच्या घरातून ८० हजार रोख रकमेसह सोने चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पाचोरा पोलिसांसह जळगाव वरून श्वानपथक दाखल झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील माहिजी येथील रहिवासी संजय मन्साराम पाटील हा अल्पभूधारक शेतकरी आपल्या घरच्या शेतातील काम आटोपून दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरी आला. घरात असलेल्या लोखंडी कपाटातील साहित्य अस्तव्यस्त झालेले पाहून त्यांनी गावातील पोलिस पाटील राजेंद्र पाटील यांना माहिती दिली. पोलिस पाटील यांनी तत्काळ पाचोरा पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, सचिन पवार, भगवान बडगुजर, श्यामकांत पाटील यांना घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


