मुंबई : वृत्तसंस्था
मागील वर्षी पहिल्यांदाच शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे पक्षाचे दोन वेगळे दसरा मेळावे पार पडले होते. दोन्ही गटांनी आपला दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. मागील वर्षी ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी जागा मिळाली होती. मात्र यंदाच्या वर्षी ठाकरे गटाला शिवाजी पार्कमध्ये जागा मिळेल का? याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
गेल्यावर्षी मैदानावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. यावर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाकडून आधीच अर्ज दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिकेला महिनाभरापूर्वीच अर्ज दिला आहे. महापालिका मैदानाची परवानगी देण्यासंदर्भात सावध भूमिकेत आहे. मात्र यावेळी देखील आम्हालाच मैदान मिळेल असा विश्वास ठाकरे गटाला आहे. बीकेसीतील विकासकामांमुळे यंदा बीकेसीत मेळावा घेणं शक्य नाही. त्यामुळे शिवसेना शिंदेगटाकडून महालक्ष्मी रेसकोर्सवर दसरा मेळावा घेण्याच्या विचारात असल्याची माहिती विश्वसणीय सूत्रांनी दिली आहे.


