नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बहुतेक लोकांना साप या शब्दाचा उल्लेख जरी कानावर पडला तर भीती वाटते. मग एखादा साप आपल्या अंगावर कळत- नकळतपणे चढला आणि तोही किंग कोब्रा असेल तर काळजाचा ठोका चुकला नाही तर नवलच! कारण कोब्रा हा सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणून ओळखला जातो. याचा एक दंश मानवासह अनेक प्राणिमात्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो. असाच एक भला मोठा किंग कोब्रा झाडाखाली बसलेल्या एका तरुणाच्या शर्टात शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्यांची तर भीतीने गाळण उडालीच, पण ज्या युवकाला या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले त्याची अवस्था काय झाली असेल, याची कल्पना करूनच आपल्यालाही घाम फुटला ना !
या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, झाडाखाली बसलेल्या युवकाच्या शर्टात भलामोठा काळाकुट्ट असा किंगकोब्रा हळूहळू शिरत आहे. यानंतर फणा काढून शर्टाच्या बाहेर जीभ चाटत इकडे-तिकडे वळवळत आहे. यावेळी हा गंभीर असा प्रसंग पाहणाऱ्यांकडून त्या तरुणाला काही टिप्स दिल्या जात असल्याचे आवाज ऐकावयास येत होते. याप्रमाणे तो तरुणही जीवाच्या आकांताने टिप्सप्रमाणे समोरच्या बाजूला जसजसा झुकत गेला तसतसा कोब्राही शर्टाच्या बाहेर पडून बाजूच्या झुडपामध्ये घुसला. आयपीएस रुपिन शर्मा यांनी ट्विटर अकाउंटवरून १ मिनीट ३४ सेकंदांचा हा व्हिडीओ शेयर केला आहे


