जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील ९ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला हद्दपारीचे आदेश काढल्याचा राग आल्याने त्या गुन्हेगाराने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना फोनवरुन जाब विचारला. त्यानंतर सायंकाळी थेट प्रांतधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी जावून त्यांची उर्मट भाषेत बोलत माझ्यावर काय कारवाई केली. तुमच्या घराचा दरवाजा उघडा ठेवा, मी परत येईल अशी धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रांतधिकाऱ्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पोलीस अधिक्षकांकडे सादर केला होता. चौकशीअंती भुषण सपकाळे याला २ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहे. या हद्दपारीच्या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पाहिले आहे.
शहरातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या भूषण सपकाळे याच्यावर ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपार करण्यासाठी हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधाळकर यांच्याकडे पाठविला होता. त्या प्रस्तावावर सुनावनी झाल्यानंतर भूषण सपकाळे याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी शुक्रवारी काढले. भूषण सपकाळे याने थेट महेश सुधाळकर यांच्या मोबाईलवर फोन लावून त्यांच्यासोबत अर्वाच्च भाषेत बोलून माझ्याविरुद्ध काय कारवाई केली याबाबत विचारणा केली. यावर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कार्यालयात भेटून आदेशाची प्रत घेवून जा सांगत फोन कट केला.
शासकीय निवासस्थानी जावून दिली धमकी उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधाळकर यांनी फोनवरुन माहिती न दिल्याने हद्दपार केलेल्या भूषण सपकाळे हा थेट एका सहकाऱ्यासोबत त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहचला. त्याने शिपायाला बाजूला सारत महेश सुधाळकर यांना कारवाईबाबत जाब विचारून तुमच्या घराचा दरवाजा उघडा ठेवा, मी परत येईल अशी धमकी देवून तो तेथून पसार झाला.
घटनेची माहिती उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोली अधीक्षकांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी प्रांतधिकाऱ्यांचे घर गाढून घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलिसांनी भूषणचा शोध घेत त्याची धुळे कारागृहात रवागनी केली.


