मुंबई : वृत्तसंस्था
कोविड घोटाळ्यातील आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीच्या विरोधात साक्ष दिली आहे. ईडीने आपला जबाब जबरदस्तीने नोंदवून घेतल्याचा त्यांचा दावा आहे. याविषयी शुक्रवारी पत्रकारांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना छेडले असता त्यांनी उपरोक्त विधान केले.
संजय शिरसाट म्हणाले की, पाटकर यांना उगीच चौकशीसाटी बोलावण्यात आले का? त्यांना उगीच कोठडीत घेतले का? कुणालाही मारून आरोप सिद्ध करता येत नाहीत. तुमच्याकडे दस्ताऐवज असतील किंवा तुम्ही एखाद्या गुन्ह्यात अडकला असाल, तरच शिक्षा होते. पुरावे नसले तर तुम्ही खून केला तरी न्यायालय तुम्हाला सोडते. पण पुरावा असेल तर तुम्हाला कुठेही माफी मिळत नाही. त्यामुळे याचिका दाखल करून काहीही होत नाही. पाटकर यांना मदत करणाऱ्यांना माझा इशारा आहे. आता त्यांची वेळ येणार आहे. तुम्हाला तुरुंगात जावेच लागेल, असे शिरसाट म्हणाले.
यावेळी शिरसाट यांना कोण – कोण तुरुंगात जाणार? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट नावे घेऊन एकच खळबळ उडवून दिली. या प्रकरणी संजय राऊत व अनिल परब असतील. याशिवाय ठाकरे कुटुंबातील कुणी असेल, तर तो ही आत जाईल, असे ते म्हणाले.


