जळगाव : प्रतिनिधी
शहरातील आसोदा रोडवर असलेल्या एका मंदीराजवळून एकाची मालवाहू चारचाकी वाहन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुना ममुराबाद रोड परिसरातील चौघुले प्लॉट येथील रहिवासी मिलींद शशिकांत दलाल (वय-३६) हा तरूण टेंट हाऊसचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांच्याकडे सामान वाहतूक करण्यासाठी (एमएच ०४ जीएफ ९०१२) क्रमांकाचे चारचाकी वाहन आहे. २७ जुलै रात्री ११ वाजता ते २९ जुलै सकाळी ९ वाजेच्या दरम्यान जळगाव-आसोदा रोडवरील मुंजोबार मंदीराजवळ चारचाकी वाहन पार्कींग करून लावले होते. अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहन चोरून नेल्याचे समोर आले.
मिलींद दलाल यांनी वाहनाचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.


