अमळनेर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध वाळू माफीया आता आपल्या उदरनिर्वाहासाठी नागरिकांचा जीव घेताय कि काय अशीच घटना अमळनेर तालुक्यात घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या वाळू माफियावर असलेली प्रशासनाची पकड सैल झाली असून ते कुणालाच जुमानत नसल्याची बाब समोर आली आहे. अवैध वाळू वाहतुकीला विरोध केला म्हणून अमळनेर तालुक्यात सहा जणांनी एका युवकाच्या गुप्तांगावर फावड्याने वार करून त्याच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून जीवे ठार मारल्याची घटना १६ रोजी रात्री 9 ते 17 रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली.त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी सहापैकी दोघांना अटक केली आहे.
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी जयवंत यशवंत कोळी (वय 34) यांचे पायकेर शिवारात शेत असून शेती शेजारी नाला आहे. ११ रोजी रात्री जयवंत व त्याची पत्नी शुभांगी शेतात पाणी भरायला गेले असता मांडळ येथील अशोक लखा कोळी हा मोटरसायकल वर थांबून होता व त्याच्या ट्रॅक्टरमध्ये नाल्यात विशाल अशोक कोळी ,सागर अशोक कोळी ,विनोद अशोक कोळी , रोहन बुधा पारधी व पिंटू शिरपूरकर असे रेती भरत होते. त्यावेळी जयवंत यांनी त्यांना रेती भरू नका , रस्ता खराब होतो म्हणून त्यांचे अर्धवट भरलेले ट्रॅक्टर परत केले होते. त्याचा राग येऊन अशोकच्या मनात होता. त्यामुळे तो जयवंतवर नजर ठेवून होता. १६ रोजी रात्री 9 वाजता जयवंत शेतात मक्याला पाणी द्यायला गेला होता. 17 रोजी सकाळी सात वाजता जयवंत बनियन व निकर वर मयत अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. लागलीच नातेवाईकांनी जयवंतला खाजगी दवाखान्यात नेले असता त्याला तातडीने धुळे येथे नेण्यास सांगितले. शुभांगी कोळी हिने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की वरील सहा जणांनी जयवंत याचे गुप्तांग तोडून अंगावर ट्रॅक्टर चालवून त्याचा खून केला आहे. म्हणून सहा जनांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान घटनेचे वृत्त कळताच एपीआय जयेध खलाने यांनी घटनास्थळी भेट दिली. डीवायएसपी राकेश जाधव यांनी हॅम्पी श्वान व पथक तसेच फॉरेन्सिक पथकाला बोलावले. विकास वाघ , किरण चौधरी , तसेच विनोद चव्हाण , शेषराव राठोड यांनी आरोपींच्या मार्गाचा मागोवा शोधला तसेच मयताची टोपी ,मफलर , कपडे यांच्यावरील रक्ताच्या डागचे नमुने घेतले. मयताचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांनी अमळनेर तहसील कार्यालयात आणला. सर्व आरोपीना अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली होती. डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी मयताच्या भाऊ व नातेवाईकांची समजूत काढून आरोपीना लवकर अटक केली जाईल व कोणालाच माफ केले जाणार नाही असे आश्वासन दिल्यानन्तर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. मांडळ येथे आरसीएफ पालटून व अमळनेर पारोळा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.