जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जुना खेडी रोड परिसरातील सुंदरनगरमध्ये तीन बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी याठिकाणाहून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला असून, याप्रकरणी सायंकाळी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुंदरनगर येथे संदीप रामलाल चौधरी हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. संदीप चौधरी हे पत्नी व मुलांना घेण्यासाठी शनिवारी धरणगाव येथे सासूरवाडीला गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
संदीप चौधरींच्या घरात डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराशेजारी राहणारे पंकज सपकाळे यांच्या घराचे कुलूप तोडले. परंतु चोरट्यांनी घरात शिरता न आल्याने त्यांच्या घरात केवळ चोरीचा प्रयत्न फसला आहे. याच परिसरात योगेश जाधव हे कुटुंबीयांसह राहतात. ते अकोला येथे गेले आहे. त्यांच्या घरात सुद्धा चोरट्यांनी डल्ला मारला. येथून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली असल्याची माहिती जाधव यांच्या पत्नीने फोनवरून पोलिसांना दिली. एकाचवेळी तीन घरांत चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस येताच पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, शनिपेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण, गुन्हे शोध पथकातील परीस जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर श्वान व फॉरेन्सिकच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.