पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्र केसरीचा यंदाचा खिताब नांदेडच्या शिवराज राक्षे याने पटकावलाय. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम लढतीत शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गाडकवाड याचा अवघ्या 55 सेकंदात पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या खिताब वर नाव कोरलं.
शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे सराव करतो. तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामधील शिरसीचा आहे. तो देखील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडेच सराव करतो. एकाच तालमीतील मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. यात शिवराजने विजय मिळवलाय.
शिवराज हा पुण्यातील खेड तालुक्यातील असला तरी तो सध्या नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतो. त्याने कनिष्ठ गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तो महाराष्ट्रातील आघाडीचा मल्ल आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याने गतवेळच्या महाराष्ट्र केसरीमधून माघार घेतली होती. गेल्यावेळी देखील महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये गणला जात होता. दुखापतीवर मात करून यंदाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब मिळवायचाच या निर्धाराने तो मैदानात उतला होता. अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न यंदा पूर्ण झाले.