सातारा : वृत्तसंस्था
ऑक्टोबर 2019 मध्ये पोटच्या दोन मुलांचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सातारा कोर्टाने हा निकाल दिला आहे. दोषी चंद्रकांत मोहितेने शिरवळ इथे आपल्या दोन मुलांची हत्या केली होती. या आरोपात दोषी ठरल्यानंतर सातारा कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस जाधव यांनी हा निकाल दिला.
हे प्रकरण सुमारे सव्वातीन वर्षांपूर्वीचं म्हणजेच ऑक्टोबर 2019 मधील आहे. आपल्या पश्चात पत्नी मुलांचा सांभाळ करणार नाही, असं वाटल्याने चंद्रकांत मोहितेने दोन्ही मुलांची निर्दयीपणे हत्या केली. त्याने शिरवळमध्ये आपला सात वर्षांचा मुलगा प्रतीकचा गळा आवळून खून केला तर 11 वर्षांच्या गौरवीची रस्त्यावर डोकं आपटून हत्या केली होती. आरोपी चंद्रकांत मोहिते हा मुंबईतील घाटकोपरमध्ये राहायचा. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील रासाटी हे त्याचं मूळ गाव आहे.
चंद्रकांत मोहितेने नैराश्येतून ही हत्या केल्याचं म्हटलं जात होतं. आपल्या पश्चात आपल्या मुलांचं कसं होणार? पत्नी मुलांचा सांभाळ करणार नाही, असं त्याला वाटत होतं. त्यामुळेच त्याने मुलांना संपवण्याचा निर्णय घेतला. 9 ऑक्टोबर 2019 रोजी चंद्रकांत मोहिते हा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन कारमधून घाटकोपरहून साताऱ्याच्या दिशेने रवाना झाला. साताऱ्याच्या शिरवळ परिसरात आल्यावर त्याने सात वर्षांच्या प्रतीक आणि अकरा वर्षांच्या गौरवीचा खून केला. त्यानंतर दोन्ही मुलांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी ते कारच्या डिक्कीत ठेवून निघाला होता. त्यावेळी पोलिसांकडून तपासणी सुरु असताना त्याच्या गाडीत दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. त्यानंतर याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला दिली आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपी चंद्रकांत मोहितेला अटक करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. शिरवळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी संबंधित प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. या खटल्यात साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. यावरुन चंद्रकांत मोहितेला दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला जन्मठेप तसंच 10 हजार रुपये दंडांची शिक्षा ठोठवण्यात आली. हा दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.