नांदेड ; वृत्तसंस्था
आजीजवळ शिक्षणासाठी राहण्यासाठी आलेल्या एका सातवीतील चिमुकलीवर नात्याने चुलता लागणाऱ्या एका आरोपीने अत्याचार केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली होती. तर या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान आता यावर न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून, न्या. आर. एम. पांडे यांनी आरोपी चुलत्याला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीची आई पुण्यात राहत होते. त्यामुळे मुलगी ही आजीजवळ राहून शिक्षण घेते. दरम्यान 29 जानेवारी 2010 रोजी पीडित मुलीची तब्येत ठीक नसल्याने ती घरीच होती. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मुलीची आजी ही दळण आणण्यासाठी गिरणीवर गेली होती. तर मुलगी अंगणात झाडलोट करीत होती. त्याचवेळी नात्याने चुलता लागत असलेला आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने पीडित मुलीला जबरदस्ती करून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. आजी परत येईपर्यंत येथून तो पळून गेला.
मात्र घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास आरोपी आपल्याला मारहाण करेल या भीतीने पीडीत मुलीने ही बाब अगोदर कुणाला सांगितली नव्हती. मात्र नंतर मावस बहीण आणि आईला याबाबत माहिती दिली. त्यानंतर अन्य एका चुलत्याला सोबत घेऊन पीडितेने लिंबगाव पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी चुलत्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोनि. बोरसे यांनी केला. तर सपोनि चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राम बोईनवाड, संगीता जाधव यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपी चुलत्याला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.