मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटे 6 वाजताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले आहेत.
हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीसह आयकर विभागानेही छापे टाकल्याची माहिती आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयासह 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणीच ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज ईडी व आयकर विभागाने छापेमारी केल्याबाबत हसन मुश्रीफ यांनीही माध्यमांकडे पुष्टी केलील आहे. लवकरच सर्व माहिती घेऊन बोलणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सध्या हसन मुश्रीफ हे कोल्हापुरात नसून मुंबईत असल्याची माहिती आहे.
हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे पडले आहेत. जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागानं केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावरही आयकर विभागाने छापा टाकला होता.