चाळीसगाव : प्रतिनिधी
धुळे रोडवरील उदेसिंग आण्णा सोसायटीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घरातून ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. ३ रोजी दुपारी ३:३० ते दि. ८ रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमलबाई अमरसिंग पाटील (वय ७२, धुळे रोड, चाळीसगाव) यांनी शहर पोलिसांत मंगळवारी फिर्याद दिली असून, त्यानुसार त्या व त्यांचे पती नाशिक येथे दि. ३ रोजी कामानिमित्त मुलाकडे गेले होते. जाताना घराला कुलूप लावले होते. तेथून दि. ८ रोजी रात्री आठ वाजता घरी आले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील दाराचे लोखंडी कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाट तसेच लाकडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील ६ हजार रुपये किमतीची २ ग्रॅम वजनाची सोन्याची ओमपान (पँडल) व ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. त्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.