औरंगाबाद : वृत्तसंस्था
राज्यात प्रेम प्रकरणातून हत्या कि टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविल्याच्या घटना घडत आहेत. सोयगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. भीमराव प्रकाश बोराडे असे मयत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३० वर्षीय प्रेयसीच्या विरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील भीमराव प्रकाश बोराडे हा पळसखेडा येथून जामनेर येथे क्रूझर जीपने शाळेतील मुलांची ने-आण करत असे. दरम्यान शनिवारी पळसखेडा ते वाकोद येथील आठवडे बाजारासाठी त्याने प्रवाशाची ने- आण केली होती. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता घरी परतल्यानंतर भूक लागली मी गावातून येतो, असे पत्नीला सांगून घराबाहेर गेला.
घरामधून बाहेर पडलेला भीमराव बोराडे घरी परतला नाही. रात्री उशिरा त्याच्या वडिलांना सांगण्यात आले की, मुलगा भीमराव याने एका घरी फाशी घेतली. यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्यानंतर पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. भीमराव यास जामनेर येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पळसखेडा येथे रविवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान भीमराव याचे वडील प्रकाश शंकर बोराडे यांनी सोमवारी फर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, गावातील 30 वर्षीय तरुणीचे भीमरावसोबत प्रेमसंबंध होते. तिच्या त्रासाला कंटाळून भीमराव याने आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून या तरुणीविरोधत फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.