मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती पक्षाच्या एका कार्यकर्त्याने दिली. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, असे ते म्हणाले. “त्यांच्या उजव्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सोमवारी सांगितले की, शरद पवार एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने ते जाऊ शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या काही काळापूर्वी त्यांच्या एका डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. शरद पवार यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असून दक्षता म्हणून त्यांना 18 जानेवारीपर्यंत विश्रांती घ्यावी लागणार आहे. शरद पवार यांच्या डाव्या डोळ्यावर डिसेंबर महिन्यात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यांना सलग आठ दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. शरद पवार विश्रांतीच्या काळात घरातून कामकाज पाहू शकतात. ते घरातल्या घरात बैठका घेऊ शकणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. शरद पवार यांच्यावर गेल्यावर्षी मार्चमध्ये ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, पोटदुखीमुळे त्यांना ऑक्टोबर महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या पित्ताशयात खडे झाल्याचे समोर आले. एन्डोस्कोपीद्वारे पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी हाताला पट्ट्या गुंडाळलेल्या अवस्थेत शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला हजेरी लावली होती.