जळगाव : प्रतिनिधी
शहरातील विकास कामांसाठी 200 कोटींचा विकास निधी देऊन येत्या सहा महिन्यात शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबईत सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही बैठक झाली.
शहरातील विविध कामे निधी अभावी रेंगाळली आहेत. सत्ताधारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कामे होत नसल्याबाबत प्रचंड तक्रारी होत्या. शहरवासीयांकडून याप्रश्नी नाराजी व्यक्त केली जात असल्याचा विषय लक्षात घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याकडे बैठक घेऊन शहर विकासासाठी निधीची मागणी करण्या संदर्भात बैठक घेण्याचे ठरविले होते.त्यानुसार ही बैठक आज सोमवारी 9 रोजी झाली. आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण व अन्य अधिकारीवर्ग यावेळी उपस्थित होता. एका बैठकीमुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे या बैठकीस उपस्थित नव्हते.
सहा महिन्यात होणार कामे
शहरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची कामे येत्या सहा महिन्यात पूर्ण करून जनतेची रस्त्यांबाबतची तक्रार दूर करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यासाठी 200 कोटी उपलब्ध करून दिले जातील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.