लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील काव्यरत्नावली चौकानजीक असलेल्या उपप्रादेशीक परिवहन कार्यालयात (आरटीओ) मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दक्षता पथकाने अचानकरित्या भेट दिली. या पथकातर्फे दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यत या दक्षता पथकातील अधिकार्यांचे पथक तळ ठोकून होते.
आरटीओ कार्यलयात सकाळपासूनच आलेल्या दक्षता पथकाचे सहायक परिवहन आयुक्त अरविंदकुमार सावंत यांचेसह 4 ते 5 अधिकारी यांनी अचानक येऊन .आरटीओ कार्यालयात होत असलेल्या कामकाजाची कसून तपासणी सुरू केली असून ही नियमित तपासणी कामकाजाचा भाग असल्याचे प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना अधिकार्यांनी सांगीतले. मात्र असे असले तरी कोवीड संसर्गाच्या वर्ष दिड वर्षाच्या कालावधीनंतर अचानक झालेल्या या कारवाईने काही वेळ खळबळ उडाली असल्याचे दिसून आले.
मंगळवारी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन कामकाज सुरू होण्याच्या वेळीच बाहेरून आलेल्या दक्षता पथकाच्या अधिकार्यांनी आरटीओ कार्यालयाचा ताबा घेऊन तपासणी सुरू केली. याप्रसंगी वाहने नोंदणीसह बाहेरून आलेल्यांना प्रवेश नाकारला जात असल्याचे दिसून आले. केवळ कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकार्यांनाच कार्यालयात प्रवेश देण्यात येत होता. यामुळे सरकारी कामासाठी परगावाहून व शहरातील वाहनधारकांना बराच वेळ तिष्ठत रहावे लागले असल्याचे दिसून आले.
यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने कार्यालयात जाऊन चौकशी केली असता वरिष्ठ लिपीक श्री इंगळे यांनी आज व्हिजीलन्सच्या पथकाने केलेली चौकशी ही नियमीत कामकाजाचा भाग असल्याचे सांगितले. दुपारपर्यंत नेमकी कशाची तपासणी करण्यात आली याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.