मुंबई : वृत्तसंस्था
कल्याणमधील गौरी पाडा परिसरात एका सात वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. प्रणव भोसले असे या मुलाचे नाव असून या मुलाच्या आईच्या मित्रानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी खडकापाडा पोलिसांनी आरोपी नितीन कांबळे याला अटक केली आहे. नेमकं काय घडलं?
कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, ज्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत मुलाचा मृतदेह आढळला, त्याच इमारती मध्ये नितीन काही महिन्यांपूर्वी वॉचमनचे काम करत होता. आपले कृत्य लपवण्यासाठी नितीन पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने एका महिलेने माझे घेतलेले पैसे न दिल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे सांगितले. तर दुसरीकडे कविता यांनी शाळेतून सायंकाळी मुलगा प्रणव घरी न आल्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ नितीनला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. दरम्यान आर्थिक व्यवहारामुळे त्याने मुलाची हत्या केली की आणखी काही कारण आहे याचा शोध पोलिसांनी सुरू केला.
या घटनेबाबत माहिती अशी की, कविता भोसले महिला ही सात वर्षीय मुलगा प्रणव भोसले यांच्यासोबत खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत आहे. शाळेतून सायंकाळी मुलगा प्रणव घरी न आल्याने शाळेत जाऊन विचारपूस केली. कविताला माहित पडले की, मुलगा नितीन सोबत गेला आहे. मुलगा उशीरापर्यंत घरी न आल्याने कविता हिने खडकपाडा पोलीस स्टेशन गाठले. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याच दरम्यान नितीन कांबळे हा देखील खडकपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने कविता नावाची महिलेने माझ्याकडून पैसे घेतलेत. ती आता माझे पैसे परत करत नाही, त्यामुळे मी आत्महत्येचा प्रयत्न केला असे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नितीन कांबळेकडे अधिक चौकशी केली. प्रणवची आई कविता हिच्याकडे देखील चौकशी केली असता नितीन हा त्याचा ओळखीचे असल्याचे समोर आले.