अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय विवाहितेने तीन महिन्यापूर्वी आठ वर्षीय मुलीसह कळमसरे शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मारवड पोलिसांनी तीन महिने चौकशी केली. अखेर सोमवारी एकाच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विवाहितेने मुलीसह आत्महत्या करण्यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
कळमसरे-नीम रस्त्यावरील सबस्टेशनजवळ भाकचंद जैन यांच्या शेतातील विहिरीत 4 ऑक्टोबर 2022 रोजी नीम येथील विवाहितेने आठ वर्षीय मुलीसह आत्महत्या केली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी तीन महिन्यानंतर अशोक गटलु कोळी (रा. निम, ता. अमळनेर) याच्या विरुद्ध विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मयत विवाहितेच्या पतीने यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्याच्या पत्नीने अशोक कोळी यास कानातील 5 ग्रॅमची सोन्याची बाळी दिली होती. ती बाळी अशोकने परत केलेली नाही. तसेच पत्नीने अशोक याच्यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून अशोक हा त्याच्याकडे असलेले दोघांचे फोटो व व्हॉईस रेकॉर्डिंग गावात पसरवून बदनामीची धमकी देत होता.
या त्रासाला कंटाळून आपल्या पत्नीने मुलीसोबत आत्महत्या केली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात मृत विवाहितेच्या पतीने पहिल्या दिवसापासून अशोकवर संशय व्यक्त केला होता. त्या अनुशंगाने पोलिसांनी तपासाला दिशा दिली. या तपासात अशोक दोषी आढळुन आल्याने अखेर त्याच्या विरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे तपास करीत आहेत.