पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरात दिवसेदिव गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेला अनेक दिवस पुणे शहरात राहावे लागणार असल्याने ती भाड्याने रुम पाहत होती. त्यावेळी एका इसमाने तिला भाड्याने रूम दाखविण्याचा बहाणा करुन तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही घटना 5 जानेवारी रोजी हडपसरमधील जयप्रकाश सोसायटीत दुपारी घडली आहे. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली आहे.
संजय बाजीराव भोसले (वय 52, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी संजय भोसले याला उरुळी कांचन येथून अटक केली आहे. याबाबत उत्तर प्रदेश मधील गाझीयाबाद येथील एका 39 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझीयाबाद येथील सदर पीडित महिला मणक्याचा त्रास असल्याने उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. अनेक दिवस उपचार घ्यायचे असल्याने त्यांना राहण्यासाठी भाड्याने रुम पाहिजे होती. त्याकरिता त्या रुमची शोधाशोध करताना त्यांनी संजय भोसले यांच्याकडे भाड्याने रूम बाबत विचारणा केली.
दरम्यान, तेव्हा त्याने 5 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान रुम दाखवण्याचा बहाणा करुन त्यांना हडपसर परिसरातील जयप्रकाश सोसायटीत नेले. तेथे त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्यावर बलात्कार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास बघून घेईन, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीवर बलात्कार आणि आर्म्स ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले पुढील तपास करत आहेत.