मुंबई : वृत्तसंस्था
1993 प्रमाणे मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यावरुन मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेट माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत सवाल केला आहे की, अशा घातक गुन्हेगार, समाजकंटकांना बळ कसे मिळते? राजकीय स्वार्थासाठी लांगुलचालनाच्या राजकारणाचे घातक पट कोण रचतेय? आम्ही ‘जागर मुंबई’ मधून हेच मुंबईकरांसमोर उघड करतोय. आम्ही स्वार्थासाठी ‘मशाल’ पेटवलेली नाही आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय.
आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, 1993 मध्ये जसे बॉम्बस्फोट झाले, त्याप्रमाणे दोन महिन्यांनंतर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होणार. त्यानंतर मुंबईमध्ये जातीय दंगली होणार, असे एका संशयिताने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कळवले. त्यानंतर संशयित सराईत गुन्हेगार नबी याहया खान उर्फ के.जी. एन. लाला याला पोलिसांनी अटक केली. 1993च्या बॉम्बस्फोटातील काही आरोपी लालाच्या परिचयाचे आहेत, अशी माहिती समोर आली आहे. आमचा मुंबईच्या तथाकथित रक्षणकर्त्यांना सवाल आहे. नवाब मलिक, दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण, याकूबची कबर सजवली. आता याचा तरी निषेध करणार का?, अशा शब्दांत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.