जळगाव प्रतिनिधी: मेहरूण तलावावर विसर्जनाच्या दिवशी सहा फुटाची गणेशमूर्ती आढळून आली. शासनाच्या नियमापेक्षा जास्त उंचीची मूर्ती असल्याने याप्रकरणी मित्रमंडळाच्या तरूणाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, मेहरूण तलावावर रविवार १९ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशाच्या विसर्जनाची प्रशासनातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी अधिकार्यांसह कर्मचारी असा पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. विसर्जन सुरू असतांना मेहरूण तलावावर रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील जय समाधा गणेश मित्रमंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी आली. यावेळी बंदोबस्तावरील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मंडळाची गणेशमूर्ती ही सहा फूट उंचीची असल्याचे लक्षात आले. शासनाने केवळ चार फूटापर्यंतच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्यास यंदा परवानगी दिली होती. त्यानुसार शासन आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिस कॉन्स्टेबल साईनाथ मुंढे यांच्या फिर्यादीवरून जय समाधा गणेश मित्रमंडळाच्या संदीप पंजुमल मंधान वय ३४ रा. संत राजाराम नगर, सिंधी कॉलनी जळगाव या या तरुणाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.