मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला. त्यानंतर महिला आयोगाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली. अशात उर्फी प्रकरणात आता करुणा धनंजय मुंडे-शर्मा यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज उर्फी जावेदच्या कपड्यांवरून जो काही वाद सुरू आहे त्यात तिच्या कपड्यांवर मी देखील विरोध करते. इकडे-तिकडे अर्धनग्न फिरणे ही सर्वच महिलांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. ज्या महिला आणि राजकारणी महिला उर्फीला पाठींबा देत आहेत त्यांना मी सांगते की, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही अशा चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत आहात. ज्या ज्या महिला उर्फीच्या मताशी सहमत आहेत त्या सर्व बिनडोक आहेत. अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे.
उर्फी जावेदवर सुरू असलेल्या या वादात काल तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिच्या अंगावर पुरळ उठलेले दिसत होते. उर्फीने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मला कपड्यांची ॲलर्जी आहे. अंगावर जास्त कपडे असले की, मला असा त्रास होतो. यावर चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फीची कानउघाडणी केली.”उर्फीला जर जास्त कपड्यांची ॲलर्जी असेल, तर आपल्याकडे औषधं आहेत. तिचं थोबाड फोडण्यापूर्वी एकदा तिला साडी चोळी देऊ, साडी चोळी देऊन ऐकलं नाही तर तिचं थोबाड फोडू”, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.