अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल असलेल्या राजेश ऊर्फ दादू एकनाथ निकुंभ (धोबी), रा. पारधीवाडा, अमळनेर याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीएची कारवाई केली. त्याला एलसीबीने अमळनेर येथून ताब्यात घेत नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यासाठी पाठविले आहे.
शहरातील राजेशविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, आर्म अॅक्ट, दुखापत असे एकूण ११ गुन्हे दाखल असण्यासह व प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. जामीन मिळाल्यानंतर तो पुन्हा गंभीर गुन्हे करीत असल्याने अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीएच्या कायद्यातंर्गत कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. अधीक्षक एम. राजकुमार यांनी पडताळणी करून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठविला. त्यानुसार ५ रोजी राजेश याच्यावर एमपीडीएच्या कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गुरुवार दि.५ रोजी त्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्याची नाशिक कारागृहात रवानगी केली.