जळगाव : प्रतिनिधी
घर घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामेश्वर कॉलनीमधील माहेर असलेल्या हर्षदा गणेश भगत यांचा विवाह जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील गणेश श्रावण भगत याच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवस सर्व सुरळीत सुरू असताना पतीसह सासरच्या मंडळींनी पैशांसाठी हर्षदा यांचा छळ करण्यास सुरुवात केली. घर घेण्यासाठी हर्षदा यांनी माहेरून १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी पतीसह सासरच्यांनी केली. पाच लाख रुपये घेऊन आणखी पाच लाख रुपये आणावेत. या कारणावरून रात्री-बेरात्री हर्षदा यांना घराबाहेर काढून देणे, शिवीगाळ करणे तसेच मारहाण करणे, असा शारीरिक व मानसिक छळ केला.
या छळाला कंटाळून हर्षदा या जळगावात रामेश्वर कॉलनी येथे निघून आल्या. याप्रकरणी त्यांनी बुधवारी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून विवाहितेचा पती गणेश भगत, सासू शोभा भगत दोन्ही रा. फत्तेपूर, ता. जामनेर व नणंद उज्ज्वला अनिल गाढवे, रा. औरंगाबाद या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील हे करीत आहेत.