जळगाव : प्रतिनिधी
बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करताना पावणेतीन लाखांचा गुटखा व कार असा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. तांबापुरा येथील शेख इम्रान शेख जहुरोउद्दीन हा कारने (क्र. एमएच १९ एएक्स ३५१०) भुसावळ ते जळगाव या मार्गावर तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक गणेश चोभे, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोलिस नाईक रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, प्रमोद ठाकूर यांनी ही कारवाई केली.
या पथकाने टोल नाक्याजवळ कारवाई केली. कार क्र. एमएच १९/ एएक्स ३५१० मध्ये दोन लाख ७५ हजार २६४ रुपयाचा पान मसाला व तंबाखू मिळून आला. याबाबत नशिराबाद पोलिस स्टेशनला शेख इम्रान शेख जहुरोउद्दीन रा. तांबापुरा, जळगाव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाईत गुटखा व कार असा एकूण चार लाख २५ हजार २६४ रुपयांचा ऐवज जप्त केला.