मुंबई : वृत्तसंस्था
भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर उत्तर दिलं आहे. लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला शरीरयष्टीवरून भाष्य केले. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली. अशा शब्दात राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.
‘लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही.’ अशा आशयाचे ट्विट राणे यांनी करत अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.
अजित पवार यांना कालच्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. “नितेश राणे म्हणाले होते, शरद पवारसाहेब कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत, शिवाय ते आजपर्यंत कधीही रायगडावर गेले नाहीत” असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता.