मुंबई : वृत्तसंस्था
कुठलाही विषय नसताना अजितदादा छत्रपती संभाजी महाराजांवर का बोलले? याला मुद्दाम समाजातील वातावरण गढूळ करणे म्हणतात. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्यांना मी मागणी करणार आहे की, औरंगाबादचे नाव आता धर्मवीर संभाजीनगर करा. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका करताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हते, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होत. त्यावरून त्यांच्यावर सर्वबाजूने टीका होत आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवारांची पाठराखण केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, मागे राहुल गांधीच्या सद्भावना प्रेमाच्या कुठल्या यात्रेसाठी ते आले होते आणि सावरकरांबद्दल बोलून त्यांचा अपमान करुन निघून गेले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या अतुलनीय पराक्रमाने ते मुघलांना कसे सामोरे गेले त्यांनी काय काय भोगलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आणि अशावेळेला अजितदादांसारख्या प्रगल्भ नेत्याने ते धर्मवीर नव्हते असं म्हणण दुर्दैवी आहे.
पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, आता औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर होत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्यांना मी मागणी करणार आहे की, औरंगाबादचे नाव आता धर्मवीर संभाजीनगर करा. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोध म्हणून भाजप 2 दिवस संपूर्ण राज्यात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.