मुंबई : वृत्तसंस्था
सत्ताधारी पक्षाच्या ६० आमदारांचा दरमहा खर्च हा १२ कोटी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राज्यातील 60 आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला 144 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हंटलं आहे.
राज्यात एकाच गटाच्या ४० आमदारांसह सत्ताधारी पक्षाच्या सुमारे ६० आमदारांच्या Y+ सुरक्षेचा खर्च दरमहा १२ कोटी म्हणजे वर्षाचा १४४ कोटी होतोय, तर १२ खासदारांच्या सुरक्षेचा खर्च दरमहा सुमारे अडीच कोटी असा वर्षाचा एकूण खर्च सुमारे दिडशे कोटी होतो. pic.twitter.com/Kitsw309Y0
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 1, 2023
अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या खर्चाचा आढावा ट्वीटद्वारे मांडला आहे. याचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत धनंजय मुंडे सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. तर “सत्ता पक्षातील जवळजवळ 60 आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा लागत असेल तर या राज्यात खरंच कायदा व सुव्यवस्था चांगली आहे का?”, असा प्रश्न धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित केला होता.