धरणगाव : प्रतिनिधी
जगभर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष केला जात आहे तर दुसरीकडे धरणगाव शहरात एका ३० वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका शुल्लक कारणाने हा खून झाल्याची चर्चा जरी असली तरी धरणगाव पोलिसांनी मध्यरात्रीच या प्रकरणी १७ संशयिताना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये ३१ डिसेंबर रोजी रात्री शुल्लक कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. या वादात शिरपूर तालुक्यातील दहीवड तांडा येथील ३० वर्षीय तरूण कालू सोनवणे हा मयत झाला आहे. कृष्णा जिनिंगमध्ये जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मजूर काम करण्यासाठी येत असतात. दि.३१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कालू सोनवणेचा जिनिंग मधील काही बिहार प्रदेशातील मजुरांसोबत किरकोळ विषयातून वाद झाला. थोड्याच वेळात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. साधारण १६ ते १७ जणांनी हल्ला चढवल्यामुळे कालू हतबल झाला. तेवढ्यात एकाने कालूच्या डोक्यात लाकडी दांडा टाकला. यात तो जागीच कोसळला. यानंतर सर्व संशयित आरोपी जिनिंग सोडून फरार झाले. कालूला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींच्या शोधार्थ वेगवेगळ्या भागात पथक रवाना केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी अनोरे, धानोरे,गारखेडा या भागातील जंगलांमध्ये रात्रभर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला. एकेक करून पहाटेपर्यंत पोलिसांनी तब्बल १७ जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.
पोलीस निरीक्षक राहुल खताळ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जिभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, पोका विनोद संदानशिव, पोना मिलिंद सोनार,पोलीस हवालदार संजय सूर्यवंशी, समाधान भागवत, प्रमोद पाटील, मनोज पाटील, महेश देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील, महेश पाटील या पथकाने रात्रभर जंगल भागात शोध घेऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.