मुंबई : वृत्तसंस्था
वर्षाचा शेवटचा दिवस येवून ठेपला असतांना राज्यातील भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षाचा संकल्प करीत नव्या वर्षात ठाकरे गटासाठी आपले प्लॅन्स जाहीर केले आहे.
उद्यापासून सुरु होणाऱ्या नवीन वर्षाची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. अनेक जण विविध संकल्प करत आहेत. तर नव्या वर्षात काय नवनवीन गोष्टी करायच्या याबाबत प्लॅन्स ठरत आहे. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत 2023 नव्या वर्षातले आपले प्लॅन्स जाहीर केले आहेत. 2023 मध्ये त्यांच्या निशाण्यावर कोण असणार आहे याची एक यादीच त्यांनी शेअर केलीय.
किरीट सोमय्या यांनी ट्विट केलेल्या यादीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावे त्यांनी जाहीर केली आहेत. किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर कायमच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे होती. यातील शिंदे गटात गेलेल्या शिवसेना नेत्यांची नावे वगळण्यात आली असली तरी इतर नावे अजूनही तशीच आहेत. उद्धव ठाकरेंचे त्यांचे कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे साई रिसॉर्ट प्रकरण यासह राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात ते म्हणत आहे, उद्यापासून सुरु होणाऱ्या नवीन वर्षात ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, हसन मुश्रीफ आणि किशोरी पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळा आपण उघड करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.