मुंबई : वृत्तसंस्था
भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2022 चा कार्यक्रम जाहीर केला असून सदर कार्यक्रमानुसार नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती उपायुक्त (सामान्य प्रशासन) उन्मेष महाजन यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्या नंतर विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती उपायुक्त उमेश महाजन यांनी दिली. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार पाच जानेवारीला अधिसूचना काढली जाईल. 12 जानेवारी पर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 13 जानेवारीला अर्जाची छाननी होईल माघारी साठी 16 जानेवारी अंतिम मुदत आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तर नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे आहेत. त्यांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारीला संपणार आहे.
दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदार नोंदणीसाठी वेग येणार आहे. ऑनलाइन नोंदणीला सात नोंव्हेबर पासून सुरुवात झाली असली तरी आतापर्यंत राज्यात नाशिक विभाग मतदार नोंदणी सर्वाधिक आघाडीवर आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मतदार नोंदणी प्राप्त होण्याची शक्यता आहे. सध्या कोणताही उमेदवार आपले पत्ते उघड करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करत नसल्याचे दिसून येत आहे.
अधिसूचना जारी करणे (5 जानेवारी 2023 गुरुवार)
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक (12 जानेवारी 2023 गुरुवार)
नामनिर्देशन पत्राची छाननी (13 जानेवारी 2023 शुक्रवार)
उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक (16 जानेवारी 2023 सोमवार)
मतदानाचा दिवस (30 जानेवारी 2023 सोमवार)
मतदानाचा कालावधी (सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत)
मतमोजणी दिनांक (2 फेब्रुवारी 2023 गुरुवार)