अकोला : वृत्तसंस्था
पतीला ठार मारण्यासाठी पत्नीने ओळखीतील व्यक्तीला ३० हजार रुपयांचे आमीष दाखवून त्या व्यक्तीने गळफास देऊन पतीला ठार मारले व नजीकच्या एका जीममध्ये गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे भासवले होते. मात्र, संशयावरून पोलिसांनी पत्नी आणि सुपारी किलरला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना दहिहांडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुंडा येथे गुरुवारी उघडकीस आली.
पुंडा येथील बाबर्डा मार्गावर असलेल्या जीममध्ये व्यायामासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता आढळून आला होता. त्यानंतर तो मृतदेह सचिन बांगर (३५) यांचा असल्याचे समोर आले. पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांनी घटनास्थळी सखोल चौकशी केली असता त्यांना संशय आला. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांना माहिती देऊन बोलावण्यात आले व त्यांची चौकशी केली.
यावेळी पोलिसांना मृताच्या पायावर व्रण असल्याचे व गळ्यावर गळफासाचे दोन व्रण असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी पत्नी कंचन हिला ताब्यात घेतले. त्यानंतर सचिनच्या घरी येणेजाणे असलेला डिगांबर प्रभाकर माळवे (४५) यालाही ताब्यात घेतले. दोघांचीही कसून चौकशी केली असता, पतीच्या त्रासाला कंटाळून त्याला गळफास दिल्याची कबुली त्यांनी दिली. सचिन व कंचन या दोघांना दोन लहान मुली आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत, अरूण मुंढे, महिला पीएसआय शिल्पा धुर्वे, अरूण घोरमोडे, अनिल भांडे, नीलेश गावंडे, रामेश्वर भगत, प्रफुल्ल डिडोंकार, मनीष वाकोडे, नीलेश देशमुख, भारती ठाकुर यांनी केली.