अहमदाबाद : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा मोदी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या १००व्या वर्षी होत्या. अहमदाबाद येथील रुग्णालयात हिराबा यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंतप्रधान मोदी सकाळी 7.45 वाजता अहमदाबादला पोहोचले. येथून ते थेट गांधीनगरच्या रायसण गावात भाऊ पंकज मोदी यांच्या घरी गेले. मोदी घरी पोहोचताच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. मोदी स्वत: पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाले. शववाहनातही बसले. सेक्टर-३० येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या सर्व नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती पीएमओने ट्विट करून दिली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बंगालमधील महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभही करणार आहेत. मोदींनी स्वतः ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. हिराबा यांना मंगळवारी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याशिवाय त्यांना खोकल्याचाही त्रास होता. त्यामुळे त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. हीराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आईजे जीवन म्हणजे एका तपस्वीची यात्रा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आई म्हणजे निष्काम कर्मयोगी व आदर्श मुल्यांनी जीवन जगण्याचे प्रतीक आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईला श्रद्धांजली वाहिली आहे.