मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील कट्टर विरोधक असलेले शिंदे व ठाकरे गटातील सातत्याने नेहमीच विविध आरोप प्रत्यारोप समोर येत आहे. तर मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता शिवसेना भवन ताब्यात घेण्याच्या हालचारी सुरू झाल्याचे समजते. शिवसेना भवन शिंदे गट लवकरच ताब्यात घेईल, असा दावा आज अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलाय. त्यामुळे या चर्चेला वेग आलाय. शिंदे गटाने शिवसेना भवन ताब्यात घेण्याची हालचाल केली, तर मुंबईत राजकीय वातावरण तापू शकते. येणाऱ्या काळात मुंबई महापालिका निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय खेळ्या खेळल्या जात आहेत.
गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेचा एकछत्री अंमलय. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर काल शिंदे गटाने महापालिकेतील शिवसेना कार्यालयावर दावा सांगितला. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट समोरासमोर आले. आजही या ताब्यावरून मुंबईत ठाकरे गट आक्रमक झालाय. त्यामुळे शिंदे गटाचे पुढचे पाऊल खरेच शिवसेना भवन ताब्यात घेण्याकडे पडणार का, याची चर्चा सुरूय. विशेष म्हणजे लवकरच शिंदे गट शिवसेना भवन ताब्यात घेईल, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलेय.
आमदार रवी राणा आज नागपूरमध्ये बोलताना म्हणाले की, शिवसेना भवनाचा ताबा लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल. शिवसेनेच्या नावाने शिवसेना भवनय. एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 80 ते 90 टक्के पक्षय. शिंदे गटात 40 आमदार, नगरसेवक, पदाधिकारीही आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे स्वतः शिवसेना भवनाची चावी देतील. एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे कायदेशीररित्या त्यांना हे करावेच लागेल.
शिवसेनेच्या मुंबई महापालिकेवरही राणा यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, या कार्यालयातून टक्केवारीचे काम केले जात होते. सध्या महापालिकेवर प्रशासकयत. त्यामुळे या कार्यालयाला टाळे ठोकले. यामुळे टक्केवारीचे काम थांबेल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा विचार सोडलाय. ते काँग्रेसी विचाराचे, सोनिया गांधींचे झालेत. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केलीय. त्यामुळे शिंदे यांच्यासारखा कट्टर शिवसैनिक पक्षातून बाहेर पडल्याचा दावाही त्यांनी केला.