नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्याच्या काळात सोशल मीडियावरील व्यक्त होण्याचा महत्त्वाचा सोर्स असलेलं ट्विटर ढेपाळलं आहे. आज सकाळीच ट्विटर डाऊन झालं. लॉग इनही करता येत नव्हतं आणि मेसेजही पोस्ट करता येत नव्हता. त्यामुळे जगभरातील ट्विटर यूजर्स त्रस्त झाले आहेत. शिवाय ट्विटरकडून कोणतंही कारण न देण्यात आल्याने यूजर्स अधिकच त्रस्त झाले आहेत. ट्विटर कधी सुरू होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन महिन्यांपूर्वीच एलन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केली होती. 44 बिलियन डॉलरला ही खरेदी करण्यात आली होती. तेव्हापासून एलन मस्क सातत्याने ट्विटर पॉलिसी बदलत आहेत. त्यामुळे ते अधिक चर्चेत आहेत.
आज सकाळी 7 वाजून 13 मिनिटांपासून ट्विटर ढेपाळलं आहे. त्यामुळे जगभरातील यूजर्सना लॉगिन करता येत नाहीये. सारखा एररचा मेसेज येत आहे. अकाऊंट लॉग इनच होत नाहीये त्यामुळे यूजर्सना मेसेजही करता येत नाहीये. काहींचे अकाऊंटही लॉग आऊट झाले आहेत. त्यामुळे यूजर्स अधिकच त्रस्त झाले आहेत. शिवाय ट्विटरकडूनही या बिघाडावर काहीच खुलासा न झाल्याने ट्विटर का ढेपाळलं? हे समजून येत नाहीये.
सकाळी 7.30 वाजेपर्यंत 8700 यूजर्सनी आपल्या अडचणी सांगितल्या. लॉग इन करताना एररचा मेसेज येत असल्याचं यूजर्सनी सांगितल्याचं म्हटलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा ट्विटर ढेपाळलं आहे. 11 डिसेंबर रोजीही ट्विटर ढेपाळलं होतं. तेव्हाही यूजर्संना अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यावेळी ट्विटर का ढेपाळलं याचं कारण ट्विटर कंपनीकडून तात्काळ देण्यात आलं होतं.